Skip to main content

Posts

हे कसं सांगू ? आई - बाबा ओरडतील !

 *हे कसं सांगू ? आई बाबा ओरडतील!* आज जरा धडधडतच होतं सकाळपासून छातीत. शाळा तर सुटलीय पण घरी जायची जरा भितीच वाटतेय. आज घरी गेल्यावर नक्की काय होईल या विचारानं होत होती धडधड. पण पर्याय काय जावं तर लागणारच. असो.. पावलं घराकडं पडू लागली पण रोजच्या सारखी झपाझप नाही तर अगदी हळूहळू. आणि तरीही आज मात्र घर लवकर आलं. अंगणात आज्जी बसलेली होती काॕटवर,जरा तिरक्या नजरेने बघत होती.तिथंच कल्पना आली आत गेल्यावर काय होणार याची. हिम्मत करून जडजड झालेली पावलं उचलत चार पायऱ्या चढल्या उंबरा ओलांडला आणि कशीबशी आत गेले. इकडं तिकडं बघितलं तर दादा अभ्यास करत होता,बाबा टिव्हीवर बातम्या बघत होते तर आई तिथे दिसत नव्हती म्हणजे नक्की स्वयंपाकघरात असणार. हळूच दप्तर जागेवर ठेवलं.शहाण्या बाळासारखं ताबडतोब आत जाऊन हातपाय धुतले.शाळेचा ड्रेस काढला हळूच स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं आणि गुपचूप सोफ्यावर येऊन बसले. मला वाटलं होतं तसं घरात काहीच घडलं नाही. वाटलं होतं गेल्या गेल्या गालावर दोन सपके बसतील शिक्षा होईल आणि आई फरमान सोडेल आज जेवायला मिळणार नाही. पण इथंतर सगळंच उलटं चाललेलं. मी शाळेतून घरी आलेलं देखील कुणाला कळलं...
Recent posts

हा प्रवास असा थांबताना....

 *हा प्रवास असा थांबताना* ......    आज मनाशीच बोलत होतो.मन मनाशीच मोकळं करत होतो. का ? का एवढी घाई केली देवा ? अजून जगायचं होतं. खूप काही करायचं होतं. अनेक स्वप्न जी रंगवली होती ती पूर्ण करायची होती. आत्ता कुठे माझ्या पंखात बळ आलं होतं. हळूहळू माझं विश्व विस्तारण्याचा प्रयत्न मी करत होतो. खूप आनंदी होतो. सहचारिणी मनाजोगती मिळाली होती. खूप कठीण प्रसंगात अगदी वाघिणी सारखी उभी राहिली माझ्या मागे म्हणूनच मी यशस्वी होऊ शकलो. हसतमुखाने घर सांभाळत माझ्या माणसांना आपलंसं करताना तिची होणारी तारांबळ मला कळत होती पण कौतुकही होतं की लढतेय प्रयत्न करतेय. शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या माझ्या या लढतीत तिनं कधी कधी काही मागितलं नाही,हट्ट केला नाही,रूसवा फुगवा नाही. म्हणूनच आता तिचे सगळे लाड पुरवायचे होते. तिच्या सोबत चार निवांत क्षण घालवायचे होते. खूप बोलायचं होतं. तिचं ऐकायचं होतं. सगळं सगळं राहून गेलं. आमची पिलं पण कावरीबावरी झालीयत. आई दिसतेय समोर पण बाबा नजरेस पडत नाही,शोधलं तरी सापडत नाही,फोन सुध्दा उचलत नाही,कुणी काहीच सांगत नाही. आईच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ कळत न...

मला बाबाच आठवत नाही

 *मला बाबाच आठवत नाही* चर्रर्र.. झालं काळजात,त्याचं हे वाक्य ऐकून. क्षणभर पसरलेली ती शांतता जणू स्मशान शांतता भासली. काय बोलावं,कसं व्यक्त व्हावं,काहीच समजण्याच्या आत तोच अगदी निखळ,निर्मळ,खळखळून हसत मलाच विचारत होता,*मग मित्रा काय म्हणतोयस काय चालूय अजून आयुष्यात* मग मी पण थोडा भानावर येऊन त्याच्या त्या निखळ हास्यात बुडून गेलो आणि मग अनेक वर्षांनी भेटल्याने त्या जुन्या गप्पांची मैफील रंगली.*मैफील फक्त दोघांचीच* पण अगदी भरलेली.गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला हे कळलंच नाही आणि कळलं तेव्हा जवळजवळ सुर्यदेव अस्ताला आले होते. मग एकमेकांना *प्यार की झप्पी* देऊन लवकरच पुन्हा भेटण्याचं आश्वासन वगैरे देऊन झाल्यावर आम्ही दोघे आपापल्या गाड्यांमधून वेगवेगळ्या दिशेने निघालो. गाडी सुरू करताच मी सवयीप्रमाणे रेडिओ सुरू केला आणि सुरू झाला कार्यक्रम *पुरानी यादोंका सफर* दोन तीन गाण्यांनंतर गाणं लागलं ते *तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हू़ मैं.तेरे मासुम सवालोंसे परेशान हूँ मैं* आणि अचानक माझा ब्रेक लागला कर्रर्र... आणि मी दचकलो. कसतरी वाटू लागलं म्हणून गाडी बाजूला घेतली,तोंडावर थोडं पाणी मारलं,एसी वाढवला...

झोपाळ्या वाचून झुलायचे

झोपाळा,झोका,झुला,झोळी,पाळणा सगळेच शब्द परिचयाचे. आपले आपलेसे वाटणारे. आयुष्याची सुरूवातच होते या झोपाळ्यातून. तसा पहिला झोपाळा म्हणजे आईच्या किंवा आज्जीच्या हाताचा झोका किंवा पाळणा. मग येतो तो बाजारातून हौसेने आणलेला वेगवेगळे चित्र झुरमुळ्या लावलेला लाकडी किंवा हल्ली मिळतो तो स्टिलचा पाळणा. पण जी मजा आईच्या हाताच्या पाळण्याची असते ती या सगळ्या गोष्टीत नाही हे मात्र खरं. दिवसागणिक आपण मोठे होत जातो. आपले विश्व बदलत जाते. मित्रमैत्रीणी शाळा काॕलेज या सगळ्यात आपण एवढे गुंग होतो पण आई मात्र तशीच तिथेच त्या झोक्याची दोरी धरून आशेने उभी असते की कधीतरी मुलं माघारी येऊन पुन्हा तिच्या मांडीवर डोकं टेकतील आणि ती थकलेली आई मांडी हलवून अलगद पुन्हा तुम्हांला त्याच झोपाळ्यात घेऊन जाईल. आईची ती माया प्रेम मधल्या काही काळात सगळ्यांनाच आडचण वाटू लागते. आणि आई मात्र तुम्ही घरी आल्यावर तिला विचाराल "आई कशी आहेस कसा गेला तुझा दिवस" आणि या एका तुमच्या मायेच्या विचारणेनेही ती थकलेली आई आनंदाने मनाच्या हिंदोळ्यावर बसून उंच उंच झोका घेईल तिचा आनंद कसा गगनात मावणार नाही याची वाट पहात असते.  वेळ चालतच...

आई

 *आई* थकलीस ना गं.... बस जरा शांत घटकाभर. चार दिवसापासून चालूय न ही धावपळ. कशी गं तू अशी वेडी. इतकं करू नये गं आपल्या जीवापेक्षा जास्त. हसलीस ना गालातल्या गालात म्हणत असशील *जीवासाठीच करतेय जीवापेक्षा जास्त कसं असेल* आई दिवाळीला दोन दिवसच का होईना मी येणार म्हणून किती किती न काय काय केलंयस. अगं पण आयुष्यभर राबलीसच की घरासाठी,पाहुण्यारावळ्यांसाठी,आमच्यासाठी. सगळ्यांच्या आवडीचं सगळं करत राहिलीस पण कधी आवडीनं एक घास शांतपणे खाताना पाहिलं नाही गं तुला. कदाचित आमच्या आमच्या नादात असू आम्ही तुझा विसर पडला, आणि आत्ता संसाराच्या गडबडीत पुन्हा आम्ही आमच्याच नादात,पुन्हा पडला विसर. पण आई तुला का नाही पडत गं हा विसर. यावेळी पण मला आवडते म्हणून तुझ्या हातचे अनारसे आणि नातवंडांना आवडते म्हणून शंकरपाळी केलीच असेल ना.  आता यावेळी  तुला विचारूनच घ्यायचं असं ठरवून आले आहे न विसरता *तुला काय आवडतं ते*  आम्ही येणार त्या  दिवशी तर घराला तू अगदी सजवून टाकलं होतंस. डोळ्याची निरांजनं पेटवून अंगणात येरझारा चालू होत्या तुझ्या अन् बाबांची थट्टा. कसं होणार गं तुझं... अगं दमली असशील पायाला...

बाप्पा

 बाप्पा... हे दहा दिवस कसे संपले कळलंच नाही रे. मागच्या वर्षी तू गेलास त्याच दिवशी मनाशी पक्क ठरवलं होतं पुढच्या वर्षी तुझं जंगी स्वागत करायचं,राहून गेलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि या जीवनाच्या  रहाटगाडग्यात पुढे चालू लागलो. यंदा तुझ्या आगमनाची चाहूल लागली ती थोडी मागील वर्षापेक्षा बरी कारण मागच्या वर्षी आम्हांला तुझ्या येण्याच्या निमित्ताने भागवता येणारी कोणतीच हौसमौज करता आली नव्हती संकटच तेवढं मोठं होतं जगावर पण यंदा तू आलास तेच ही महामारी दूर करून, आणि आम्ही सगळे सज्ज होतो तुझ्या स्वागतासाठी. मग काय आठ दिवस आधी तुझ्या मुर्तीची निवड,घरात तुझ्या भोवती  आरास करण्यासाठी लागणारं सामान,मखराची तयारी, दुर्वांच्या जुड्या,हार फुलं,फळ,प्रसादाची तयारी, सकाळ संध्याकाळी आरती म्हणण्यासाठी आरतीच्या पुस्तकाची शोधाशोध तर घरातल्या बच्चे कंपनीला यंदातरी *संकष्टी पावावे* असं म्हणू नका रे पोरांनो असा बजावणारा आज्जीचा खणाखणीत आवाज, सगळं कसं उत्साहात सुरू झालं. तू यायच्या दिवशी तर कुणी सोवळ्यात,कुणी झब्बा कुरता,कुणी नवीन जीन्स तर कुणी नऊवारी,सहावारी,चुडीदार,वेगवेगळे दागदागिने पुरूषांची ड...
आम्हाला पण स्पेस हवीय : लहानपणी स्पेस म्हणजे अंतराळ ऐवढाच अर्थ माहित होता. पण परवा मैत्रीणीकडे गप्पा मारायला गेले, तेव्हा तिने तिच्या आठ वर्षाच्या मुलीला आवाज दिला आणि बोलावून घेतलं ,म्हणाली बच्चू मावशी आलीय ये गप्पा मारायला at_least say hello to her baby. तेवढ्यात ती चिमुरडी जोरात बोलली please mom give me space yaar. मला अगदीच आश्चर्य वाटलं की एवढ्याशा चिमुरडीला कसली हवीय Space. मी गप्पा मारून तिचा निरोप घेऊन निघाले खरी. घरीही पोहोचले, पण डोक्यातून स्पेस हा शब्दच जाईना. दिसायला, लिहायला आणि उच्चारायला अगदी छोटासा शब्द असला तरी खूप मोठा अर्थ आहे या शब्दाला. मन विचाराने सैरभैर झालं होतं.डोक्यात प्रचंड विचारांचं वादळ आणि विविधांगी प्रश्न बरीचशी अनुत्तरीतच. खरंच काय आहे ही स्पेस ? छोट्या छोट्या मुलांना आई-बाबां पासून स्पेस हवीय, तरूण मुलांना त्यांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी कुटुंबाबरोबरच समाजापासूनही स्पेस हवीय,मुलगा सुनेला आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापासून स्पेस हवीय. अर्थात सध्या सगळ्यांनाच स्पेस हवीय स्वतःची. मला तर लहानपणी आज्जी सांगायची ती गोष्ट आठवली ध्रूव बाळाची. त्यालाही हवी...