Skip to main content

मला बाबाच आठवत नाही

 *मला बाबाच आठवत नाही*


चर्रर्र.. झालं काळजात,त्याचं हे वाक्य ऐकून. क्षणभर पसरलेली ती शांतता जणू स्मशान शांतता भासली. काय बोलावं,कसं व्यक्त व्हावं,काहीच समजण्याच्या आत तोच अगदी निखळ,निर्मळ,खळखळून हसत मलाच विचारत होता,*मग मित्रा काय म्हणतोयस काय चालूय अजून आयुष्यात* मग मी पण थोडा भानावर येऊन त्याच्या त्या निखळ हास्यात बुडून गेलो आणि मग अनेक वर्षांनी भेटल्याने त्या जुन्या गप्पांची मैफील रंगली.*मैफील फक्त दोघांचीच* पण अगदी भरलेली.गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला हे कळलंच नाही आणि कळलं तेव्हा जवळजवळ सुर्यदेव अस्ताला आले होते. मग एकमेकांना *प्यार की झप्पी* देऊन लवकरच पुन्हा भेटण्याचं आश्वासन वगैरे देऊन झाल्यावर आम्ही दोघे आपापल्या गाड्यांमधून वेगवेगळ्या दिशेने निघालो. गाडी सुरू करताच मी सवयीप्रमाणे रेडिओ सुरू केला आणि सुरू झाला कार्यक्रम *पुरानी यादोंका सफर* दोन तीन गाण्यांनंतर गाणं लागलं ते *तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हू़ मैं.तेरे मासुम सवालोंसे परेशान हूँ मैं* आणि अचानक माझा ब्रेक लागला कर्रर्र...

आणि मी दचकलो. कसतरी वाटू लागलं म्हणून गाडी बाजूला घेतली,तोंडावर थोडं पाणी मारलं,एसी वाढवला. पण तरीही चैन पडेना. त्याचं ते वाक्य काही केल्या डोक्यातून जातच नव्हतं *मला बाबाच आठवत नाही*. आज आत्ता याक्षणी मोठमोठ्याने ओक्साबोक्शी रडावं असं वाटत होतं. मग मी जरा भूतकाळात गेलो. तसा अवि आणि मी अगादी लहानपणापासूनचे मित्र  अगदी चड्डीबड्डी. एकाच चाळीत लहानाचे मोठे झालो. खूप खेळायचो.धडपडायचो,खोड्या,मस्ती तर जाम करायचो. त्या काळात आमच्या दोघांच्या जोडीला *राम - लखन* *सर्जा - राजा* वगैरे म्हणायचे लोक. कायम हातात हात. कधी कुणाच्या घरात काही कारणाने दोघांपैकी एकाला ओरडा पडणार असा अंदाज आला की दोघंपण तिथे एकत्र हजर असायचो आणि एकत्रच बोलणी खायचो. खूप घट्ट मैत्री होती आमची. तशी अविच्या घरची परिस्थिती बेताची. पण आमच्या मैत्रीच्या आड ती कधी आली नव्हती. अविचे बाबा काय करायचे हे मला निश्चित आठवत नाही हो पण आई मात्र खूप कष्ट करायची. मुलांना खूप जपायची.अविला एक छोटी बहिण होती मिनू मिनल नाव तिचं पण लाडानं सगळी चाळ तिला मिनू म्हणायची. अविचे बाबा कधी घरी नसायचेच,कधीतरी सकाळी घराबाहेर झोपलेले दिसायचे. पण तेव्हा कळायचं नाही हे असे बाहेर का झोपतात कारण चाळीत बरेचजण बाहेर झोपायचे.मोठी कुटुंबं आणि लहान घरं. मी आणि अवि शाळेत,खेळायला दिवसभर एकत्र असायचो आणि काकू म्हणजे अविची आई कामावरून घरी येईपर्यंत मिनू आमच्या घरी असायची तिची बाहुली घेऊन. तिच्या असण्यानं आमच्या घरात भातुकलीचा खेळ रंगायचा. आई बाबांना मुलीची भारी हौस पण पदरी आम्ही दोन धोंडेच. असो...

ऐके दिवशी मात्र मी अविच्या आईला खूप आक्रोश करून रडताना ऐकलं,सगळी चाळ गोळा झाली होती.मला पण बघायचं होतं काय झालं ते पण आईने मला अविला आणि मिनूला आमच्या घरात बसवून घराला बाहेरून कडी लावून घेतली. खिडकीतून फक्त आवाज येत होते. काहीतरी झालंय एवढंच कळत होतं पण काय हे कळण्याआधीच काही वेळाने सगळीकडे निरव शांतता.... खूप वेळानं आई आली तिनं घराचं दार उघडलं. आम्ही दोघे उठून उभे राहिलो,मिनू कंटाळून झोपली होती. आईने अविला पोटाशी धरलं घट्ट,तेव्हा मी पाहिलेली तिच्या डोळ्यातली ती खिन्नता आजही मला आठवते. पुढे दिवस जात होते. मनातले प्रश्न कोणाला विचारायचे,उत्तरे कशी शोधायची समजत नव्हतं. खेळता खेळता अविच्या घरी गेलं की काकू दिसायच्या अशक्त,बळ नसलेल्या. कपाळावर सजणारी टिकली आणि काळ्या मण्यांची माळ दिसेनाशी झाली होती हल्ली. हे असं का ते समजत नव्हतं.कधीतरी दाराबाहेर झोपणारे काका ही हल्ली दिसत नव्हते पण तसे ते बरेचदा नसायचे म्हणून कळत नव्हतं काय अर्थ लावावा. वय खूप लहान आणि प्रश्न खूप मोठे. आणि एके दिवशी मी सकाळी उठलो,सगळं आवरून अविला बोलवायला गेलो तर दाराला कुलूप दिसलं. मी धावतच घरी आलो आई बाबांना सांगितलं.दोघांनी एकमेकांकडे फक्त बघितलं आणि माझी नजर चुकवत ते आपापल्या कामाला लागले. त्यानंतरचे खूप दिवस मी खूप एकटा पडलो.माझा सवंगडी नव्हता. आमच्या घरातला तो भातुकलीचा खेळही मोडला होता. पुढे काय दिवस सरत गेले,मीही मोठा होत गेलो.नवीन मित्रमैत्रीणी,शाळा,अभ्यास पुढे नोकरी यात पार बुडून गेलो. कधीकधी अंधूकशी आठवायची ती चाळ,ते दिवस आणि अविसुध्दा. मग एकदा मी हिम्मत करून आईला विचारलं आई त्या दिवशी नक्की काय झालं होतं गं ? आईला पुन्हा दाटून आलं. आई बोलू लागली, त्या दिवशी दुपारी अविचे बाबा गेले... कायमचे या जगातून. खूप दारू प्यायचे,काहीही काम करत नव्हते,सतत घरात भांडणं. पण विमला मात्र सगळं सहन करायची.कधी तक्रार नाही की रडणं नाही. *कसाही असला तरी माझ्या कुंकवाचा धनी आहे* असं म्हणायची. मुलांच्या समोर त्यांच्या वडिलांचं हे रूप येऊ नये म्हणून मुलांना आपल्याकडे पाठवायची. राबराब राबायची.एकच स्वप्न उराशी बाळगून होती,*माझ्या अविला मोठा होताना बघायचंय* सारखं म्हणायची मुलांना  वाईट सवयी लागू नयेत म्हणून त्यांना मी तुमच्याकडे सोडते. खूप विश्वास होता तिचा माझ्यावर. पण या व्यसनामुळे अविच्या बाबांचा जीव गेला आणि तिच्या बिचारीच्या पायाखालची जमीन सरकली. कशीबशी सावरत होती स्वतःला पण अविच्या बाबांनी उभा केलेला कर्जाचा डोंगर मोठा होता. म्हणून तिनं चाळीतलं घर विकलं लोकांचे पैसे चुकते केले आणि कुणालाही न सांगता दोन्ही मुलांना घेऊन निघून गेली. 

मला हे सगळं आठवलं. डोळ्याचं पाणी थांबेना. एवढ्या लहान वयात हे सगळं कसं सहन केलं असेल त्यानं. आज अचानक आॕफिसच्या एका काॕन्फरन्स मध्ये आम्ही भेटलो. ओळखायचा तर प्रश्नच नव्हता पण जेवताना माझ्या सवयीप्रमाणे माझ्या शर्टवर भाजी सांडली आणि अचानक त्याच्या तोंडून आलं *विक्या साल्या कसा रे असा वेंधळा तू* आणि एकदम शांतता पसरली. तो मला साॕरी म्हणाला आणि आम्ही आमचं जेवण पूर्ण केलं.नंतर पुन्हा मिटिंग सुरू झाली.पण माझं लक्ष सारखं त्याच्याकडेच. मग मात्र मी न राहून त्याला त्याचं नाव विचारलं तर काय समोर उभा होता माझा जिगरी दोस्त अवि.मी फक्त त्याच्याकडे  बघत होतो,डोळ्याचं पाणी पुसत घट्ट मिठी मारली आणि तोही जरा बावरलाच. मग मीच त्याला माझी ओळख सांगितली. मग काय तो तर इतका गहिवरून आला. माझा हात हातात घट्ट पकडून पुढचा सेमिनार झाला. नंतरचा पूर्ण दिवस आम्ही दोघेच एकत्र. खूप गप्पा झाल्या  एकमेकांच्या घराची माहिती देऊन झाली,बायकोचे मुलांचे फोटो दाखवून झाले आणि गप्पांच्या ओघात माझ्याकडूनच काकांचं नाव निघालं आणि तो एकदम म्हणाला *मला बाबाच आठवत नाहीत रे*

हे सगळं असं झालं.आम्ही पुन्हा भेटलो. आणि आता कायम भेटत राहणार. मग मी भानावर आलो. मला हे सगळं आई बाबांना सांगायचं होतं. म्हणून मी गाडी सुरू केली आणि लगबगीनं घरी पोहोचलो. बेल वाजवली.बाबांनी दार उघडलं आणि तशी मी त्यांना कडकडून मिठी मारली. एवढी घट्ट जी इतक्या वर्षांत राहून गेली होती. एकही शब्द न बोलता तडक मी माझ्या बेडरूम मध्ये गेलो आणि माझ्या पिलांना जवळ घेतलं. त्यांनाही मिठी मारली आणि स्वतःशीच प्राॕमिस केलं की स्वतःच्या हौसेखातर,स्वतःच्या चुकीमुळे,कुठल्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करून,व्यसनाच्या आधीन जाऊन या मुलांना पोरकं नाही करायचं आणि या वयात आई बाबांना दुःख नाही द्यायचं आणि निशालाही कायम सुखी ठेवायचं.

मग ती संध्याकाळ अवि,मिनू काकू यांच्या आठवणी सांगत कशी सरली ते कळलंच नाही

Comments