*हे कसं सांगू ? आई बाबा ओरडतील!*
आज जरा धडधडतच होतं सकाळपासून छातीत. शाळा तर सुटलीय पण घरी जायची जरा भितीच वाटतेय. आज घरी गेल्यावर नक्की काय होईल या विचारानं होत होती धडधड. पण पर्याय काय जावं तर लागणारच. असो.. पावलं घराकडं पडू लागली पण रोजच्या सारखी झपाझप नाही तर अगदी हळूहळू. आणि तरीही आज मात्र घर लवकर आलं. अंगणात आज्जी बसलेली होती काॕटवर,जरा तिरक्या नजरेने बघत होती.तिथंच कल्पना आली आत गेल्यावर काय होणार याची. हिम्मत करून जडजड झालेली पावलं उचलत चार पायऱ्या चढल्या उंबरा ओलांडला आणि कशीबशी आत गेले. इकडं तिकडं बघितलं तर दादा अभ्यास करत होता,बाबा टिव्हीवर बातम्या बघत होते तर आई तिथे दिसत नव्हती म्हणजे नक्की स्वयंपाकघरात असणार. हळूच दप्तर जागेवर ठेवलं.शहाण्या बाळासारखं ताबडतोब आत जाऊन हातपाय धुतले.शाळेचा ड्रेस काढला हळूच स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं आणि गुपचूप सोफ्यावर येऊन बसले. मला वाटलं होतं तसं घरात काहीच घडलं नाही. वाटलं होतं गेल्या गेल्या गालावर दोन सपके बसतील शिक्षा होईल आणि आई फरमान सोडेल आज जेवायला मिळणार नाही. पण इथंतर सगळंच उलटं चाललेलं. मी शाळेतून घरी आलेलं देखील कुणाला कळलं नसल्यासारखं वाटत होतं, फक्त एक आज्जी सोडून 🤨. जरा रिलॕक्स फिल झालं.म्हणजे ती जोरजोरात होणारी धडधड जरा हळूहळू होऊ लागली.आता जरा आरामात सोफ्यावर टेकून पाय वर करून काहीच न झाल्याचा आव आणत निवांत बसावं म्हणलं नी आला आज्जीच्या काठीचा आवाज अन् सुरू झाली परत धडधड जोरजोरात.आता आज्जी घरात येणार आणि काढणार विषय पक्कं ठाऊक आहे मला.चला चिऊताई व्हा तयार पुन्हा मार खायला किंवा ओरडा खायला अस्सं सगळं बोलून झालं, मनातल्या मनात.आज्जी आली सोफ्यावर बसली आणि हळूच गालगुच्चा घेत म्हणाली काय गं ठमाबाई आज पोटात कावळे नाही वाटतं ओरडत. आल्यापासून भूक भूक असा तगादा नाही लावला आईकडे,ना दादाची खोडी काढलीस,ना कार्टूनसाठी हट्ट. काय काही बिनसालंय का आज ? तेवढ्यात चोमडा दादा मध्येच म्हणाला बाईंनी शाळेत शिक्षा केली असणार. अस्सा राग आला पण काय करणार..... बसले गप्प. बाबांनी पण विचारलं कोणतं चॕनल लावू तरीपण मी शांतच.म्हणलं कोणतंही.तेवढयात आई गरमागरम मॕगी घेऊन आली.अस्सा घमघमाट सुटला होता.वाटत होतं टूनकन उडी मारावी ओरडावं नाचावं, आवडीची बेजमी मिळाली होती पण मी मात्र हळूच ती डीश हातात घेतली आणि इतकी इप्पी यम्मी मॕगी मुकाट्याने खाल्ली. संध्याकाळ झाली आईने देवापुढे दिवा लावला.घरात शुभंकरोती झाली.सगळेच थोडावेळ टिव्ही बघत बसले.सगळं कसं अलबेल सुरू होतं.पण मला कळत नव्हतं मी घरातल्यांशी कसं बोलू ? कुठून आणि कशी सुरूवात करू ? खरं तर बोलायचंय,लपवायचं तर काहीच नाहीये.पण कसं बोलू ? आणि ती चिमा तर शाळेत म्हणाली की घरी सगळ्यांना सगळं समजलंय.मग जर समजलं असेल तर घरात सगळं छान छान कसं? कुणी रागवलं नाही,ओरडलं नाही. काहीच कळेना. आज जेवणात पण बेत माझ्या आवडीचा होता.जेवणानंतर अंगणात शतपावली करताना बाबांनी आज पुन्हा सानेगुरूंजींबद्दल भरभरून सांगितलं. थोडासा घरचा अभ्यास उरकून झोपण्याची तयारीही झाली.आणि दादानं दिवे बंद केले.त्या पसरलेल्या अंधारात मन सैरभैर झालं.आपण खूप मोठ्ठी गोष्ट आई बाबांपासून लपवतोय याचं वाईट वाटू लागलं.नेहमी खरं बोलावं असं शिकवलं होतं आईने तिला काय वाटेल याची भिती वाटू लागली. सांगावं की नको या द्विधा मनस्थितीत असताना मी ताडकन अंथरूणातून उठले आणि लाईट लावले तसे सगळेच उठून बसले.काय झालं असं आज्जीने विचारताच मला मात्र रडू कोसळलं.मी चुकले पुन्हा असं नाही करणार एवढंच म्हणत मी ओक्साबोक्शी रडत होते.तेवढ्यात पुन्हा आज्जीच्या काठीचा आवाज कानी पडला.आई गं! असं म्हणत ती हातातली लाकडी काठी टेकवत आज्जी माझ्याजवळ आली.मला जवळ घेतलं.डोळे पुसले. काय झालं बाळ असं तिनं विचारलं आणि माझा बांध फुटला. तिचे थरथरणारे हात पकडत हळूहळू मीच तिला खुर्चीवर बसवलं.तिच्या पायाशी मटकन बसले आणि झालेलं सगळं सांगू लागले.
आज्जी मी दररोज शाळेत जाताना त्या महादेवाच्या देवळाच्या पायरीवर ना एक आज्जी बसलेल्या असतात.मळके कपडे,विस्कटलेले केस,भूकेने व्याकूळ,थकलेलं शरीर, पण तरीही हसतमुख. मला खूप आवडतात त्या. मी येता जाता फक्त त्यांच्याकडे बघत असते.खूपदा वाटतं त्यांना काहीतरी खायला नेऊन द्यावं पण कधी दिलं नाही.दोन दिवस झाले त्या आज्जी देवळाच्या जवळच्या झाडाखाली झोपून होत्या.दोन दिवसात जाताना येताना मी त्यांना उठून बसलेलं पाहिलं नाही.म्हणून काल शाळेतून येताना त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारलं आज्जी काय होतंय गं?आज उठून नाही बसलीस ते?जरा थकलेली दिसली.मी मला जमेल तसं तिला उठवून बसवलं.माझ्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी दिलं प्यायला.तिच्या तोंडावर आलेले केस मागे केले आणि परत विचारलं आज देवळाजवळ नाही दिसलीस गं तू? तशी ती आज्जी म्हणाली अरं लेकरा काय करू गं, काल पसनं लय पाय दुखत्यात बघ.जरा उठावं म्हणलं तर पाय लटपटून पडायला व्हतंय बघ. तशी मी पटकन म्हणाले अगं मग दवाखान्यात जायचंस की,तर ती हसून म्हणाली दोन येळंच खायला मिळत न्हाय अन् दवाखान्याचं सोंग कसं परवडायचं.मला काही ते कळलं नाही.मी परत तिला विचारलं मग तू काठी का नाही वापरत आधारासाठी माझी आज्जी वापरते तशी.तर ती म्हणाली आपल्या माणसानंच आधाराचा हात काढून घेतला आता कुठली काठी अन् कसाला आधार.जाऊ दे तू कोण गं बाळा अन् हितं कशाला आलीस जा..जा..बघू घरी,घरचे वाट बघत असतील.असं कुट बी फिरूने रं लेकरा. तिचा हात सोडून मी घरी आले पण मला सारखा तिचा चेहेरा आठवत होता.मग आज सकाळी शाळेत जाताना माझं लक्ष तुझ्या काठीकडे गेलं. मनात आलं ही काठी मी देवळातल्या आज्जीला दिली तर....
म्हणून हळूच कुणी पहात नाही ना हे बघून मी तुझी काठी घेऊन पळाले आज्जीकडे गेले आणि तिला ती काठी दिली. आणि लगबगीनं शाळेत गेले.दिवसभर शाळेत मन लागलंच नाही.शेवटी मी जे केलं ते चुकीचं होतं हे कळत होतं मला.मग घरी येतात देवळाजवळ आज्जीला काठीघेऊन चालताना पाहिलं खूप आनंद झाला मला.मी मनाशी ठरावलं घरी जायचं आणि सगळं काही तुम्हांला खरं खरं सांगायचं न घाबरता,पण तेवढयात त्या चिमानं मागून येऊन तुम्हां सगळ्यांना मी जे केलंय ते समजल्याचं सांगितलं आणि मी घाबरले.पण घरी आल्यावर घरात तर सगळं छान छान सुरू होतं हे बघून तर मी जास्तच घाबरले आणि .....
आज्जी आई बाबा दादा मी चुकले.मी असं गुपचूप न सांगता घरातून वस्तू बाहेर नको होती न्यायला.आणि तेही हे माहिती असताना की आपली आज्जी काठी शिवाय चालू शकत नाही. मी चुकले गं आज्जी.खूप दुखला न गं तुझा पाय माझ्यामुळे. तेवढयात सगळे हसू लागले आणि दादानं आज्जीला तिची नवी काठी आणून दिली. मी डोळे पुसत पुसत आज्जीकडे पाहिलं तर आज्जी म्हणते कशी, *चिमणे गम्मत काय फक्त तुलाच करता येते* आणि पुन्हा सगळे हसू लागले.तशी मी परत जोरजोरात रडू लागले.मग आई जवळ आली मला कुशीत घेतलं आणि गालाचा पापा घेत म्हणाली.शहाणं गं माझं बाळ ते नकळत कधी इतकी मोठी झाली ते कळलंच नाही. आजवर आम्ही सांगितलेल्या गोष्टी,अनुभव,चांगले विचार याचा तुम्हां मुलांच्या मनावर इतका चांगला प्रभाव पडला याचाच आम्हांला आनंद आहे.*मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा* हे नकळत सांगितलेलं आज तू सार्थकी लावलंस.आम्हांला तुझा खूप अभिमान आहे.
पण..तुझा मार्ग मात्र चुकला हं.जेव्हा एखादं काम करताना आपला हेतू शुध्द आणि स्वच्छ असतो तेव्हा ते काम आपण राजरोसपणे करावे त्यात कुठलीही लपवाछपवी कधीच नसावी.चुकीची गोष्ट करताना मनात लपवण्याची भावना येते.पण तू केलेलं काम तर चांगलंच होतं नं.
यापुढे नेहमी घरात आणि घरातल्या माणसांत त्यांच्या विचारात पारदर्शकता ठेवण्याचा आपण सगळेच प्रयत्न करूया असं म्हणत बाबांनी आणि दादानं मला जवळ घेतलं आणि *हे कसं सांगू* या माझ्या अवघड प्रश्नाचं उत्तर मात्र इतकं सोप्पं होतं हे माझ्या लक्षात आलं. आणि यापुढे चांगलं काम करताना घाबरायचं नाही,कधीही खोटं बोलायचं नाही,चोरून काही करायचं नाही आणि माणसात देव शोधायचा हे मनाशी ठरवून मी शांत झोपी गेले.
*🖋️© अश्विनी कुलकर्णी / जोशी*
*सोलापूर*
Comments
Post a Comment