झोपाळा,झोका,झुला,झोळी,पाळणा सगळेच शब्द परिचयाचे. आपले आपलेसे वाटणारे. आयुष्याची सुरूवातच होते या झोपाळ्यातून. तसा पहिला झोपाळा म्हणजे आईच्या किंवा आज्जीच्या हाताचा झोका किंवा पाळणा. मग येतो तो बाजारातून हौसेने आणलेला वेगवेगळे चित्र झुरमुळ्या लावलेला लाकडी किंवा हल्ली मिळतो तो स्टिलचा पाळणा. पण जी मजा आईच्या हाताच्या पाळण्याची असते ती या सगळ्या गोष्टीत नाही हे मात्र खरं.
दिवसागणिक आपण मोठे होत जातो. आपले विश्व बदलत जाते. मित्रमैत्रीणी शाळा काॕलेज या सगळ्यात आपण एवढे गुंग होतो पण आई मात्र तशीच तिथेच त्या झोक्याची दोरी धरून आशेने उभी असते की कधीतरी मुलं माघारी येऊन पुन्हा तिच्या मांडीवर डोकं टेकतील आणि ती थकलेली आई मांडी हलवून अलगद पुन्हा तुम्हांला त्याच झोपाळ्यात घेऊन जाईल. आईची ती माया प्रेम मधल्या काही काळात सगळ्यांनाच आडचण वाटू लागते. आणि आई मात्र तुम्ही घरी आल्यावर तिला विचाराल "आई कशी आहेस कसा गेला तुझा दिवस" आणि या एका तुमच्या मायेच्या विचारणेनेही ती थकलेली आई आनंदाने मनाच्या हिंदोळ्यावर बसून उंच उंच झोका घेईल तिचा आनंद कसा गगनात मावणार नाही याची वाट पहात असते.
वेळ चालतच असते, दिवस सरतच असतात, आई म्हातारी होते तसेच तुम्हीही मोठे होत असता. आणि क्षण येतो तो तुमची स्वतःची संसारवेल फुलवण्याचा. एक नवीन व्यक्ती घरात येते आणि घराला आपलंस करू पहाते. आईला एक मैत्रीण मिळते आणि तिलाही एक आई. पुन्हा तुमचा नव्याने फुलणारा संसार पहात ती कधी तिच्या आठवांच्या हिंदोळ्यावर झुलत असते तर कधी वर्तमानात. अपेक्षा फक्त एकच असते ज्या कणखर हातांचा पाळणा करून तुम्हांला झुलवलं त्याच थरथरत्या हातांना हातात घेऊन फक्त आपलेपणाची उब द्यावी तुम्ही. कालांतराने तुम्हीही त्याच वळणावर येऊन ठेपता, आता वेळ असते ती तुम्ही तुमच्या पिलांसाठी घरटं बांधण्याची, हाताचा पाळणा करण्याची. प्रसंग तोच,परिस्थिती पण तीच फक्त पात्र वेगळे . तीही धडपडत असते त्या दुधावरच्या सायीला मांडीवर घेऊन थोपटायला,हातात घेऊन झुलवायला पण तुमचा विश्वास कमी पडतो बहुदा तो थरथरणारा हात कदाचित डगमगेल आणि.... या अनुभवातून जाताना कदाचित तुम्हांला समजेल,उमजेल एवढं सोप्प कधीच नाहीये हे. कदाचित मग तुम्ही पुन्हा वळाल तिच्याकडे तिचा तो थरथरणारा हात हातात घ्यायला, त्या बारीक बारीक झालेल्या मांडीवर डोकं टेकवायला तिचा तोच कापणारा हात डोक्यावरून फिरवून घ्ययला. या तुमच्या एका पुढे पडलेल्या पावलाने तिच्यतही येईल हत्तीचं बळ आणि अपरात्री तान्हुल्याच्या रडाण्ययानं तुमची झोप मोडू नये म्हणून ती पुन्हा करेल तिच्या हाताचा पाळणा ,झुलवेल बाळाला,गायील अंगाई,सांगेल चिवूकाऊची गोष्ट,रंगतील निरर्थक गप्पा,बांधलं जाईल बाबाचं घर उन्हात. पण हो यावेळी हाताचा झोका करताना तिचे हात कापणार नाहीत कारण तुमचा विश्वासाचा हात तिच्या जवळ असेल कायम.
Comments
Post a Comment