Skip to main content

हा प्रवास असा थांबताना....

 *हा प्रवास असा थांबताना* ......

   आज मनाशीच बोलत होतो.मन मनाशीच मोकळं करत होतो. का ? का एवढी घाई केली देवा ? अजून जगायचं होतं. खूप काही करायचं होतं. अनेक स्वप्न जी रंगवली होती ती पूर्ण करायची होती. आत्ता कुठे माझ्या पंखात बळ आलं होतं. हळूहळू माझं विश्व विस्तारण्याचा प्रयत्न मी करत होतो. खूप आनंदी होतो. सहचारिणी मनाजोगती मिळाली होती. खूप कठीण प्रसंगात अगदी वाघिणी सारखी उभी राहिली माझ्या मागे म्हणूनच मी यशस्वी होऊ शकलो. हसतमुखाने घर सांभाळत माझ्या माणसांना आपलंसं करताना तिची होणारी तारांबळ मला कळत होती पण कौतुकही होतं की लढतेय प्रयत्न करतेय. शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या माझ्या या लढतीत तिनं कधी कधी काही मागितलं नाही,हट्ट केला नाही,रूसवा फुगवा नाही. म्हणूनच आता तिचे सगळे लाड पुरवायचे होते. तिच्या सोबत चार निवांत क्षण घालवायचे होते. खूप बोलायचं होतं. तिचं ऐकायचं होतं. सगळं सगळं राहून गेलं. आमची पिलं पण कावरीबावरी झालीयत. आई दिसतेय समोर पण बाबा नजरेस पडत नाही,शोधलं तरी सापडत नाही,फोन सुध्दा उचलत नाही,कुणी काहीच सांगत नाही. आईच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ कळत नाही.कधीच न येणारी मंडळी घरी ये जा करतायत त्याचा अर्थ कळत नाही. छान छान दिसणारी आई अचानक भयान वाटतेय,तिला पाहून घाबरतायत माझी बाळं. अचानक पोरकी झालेली ती पाखरं आता पंख पसरताना धडपडतील तेव्हा मला त्यांना आधार द्यायचा होता.कधी पडलेच उडताना तर प्रोत्साहन द्यायचं होतं. सगळं सगळं अर्धवट राहून गेलं बघ. 

देवा तू मला एक सांग... असं म्हणतात जन्ममृत्यू ठरलेला असतो.वेळ निश्चित असते.मग तुला तर माहित होतं ना माझी वेळ कोणती मग मला थोडी सूचना तरी द्यायचीस. काहीतरी संकेत द्यायचास की म्हणजे मिळेत त्या थोड्या थोडक्या वेळात जरा स्वतःच्या मनाची तयारी तरी केली असती. जरा तिच्याशी बोललो असतो.पिलांना जवळ घेतलं असतं. भविष्यात ठरवून ठेवलेल्या सगळ्या गोष्टींची सोयींची माहिती तिला दिली असती. चार आनंदाचे क्षण ओंझळीत भरले असते. तू अगदीच चोरपावलानं आलास आणि सगळंच राहून गेलं. खूप त्रास झाला त्या शेवटच्या क्षणात.अहं शारीरिक नाही हं मानसिक. कारण निसटणारं सगळं दिसत होतं समोर अगदी स्पष्ट पण हतबल होतो. डोळे भरून बघता पण नाही आलं सगळ्यांना. डोळ्यावर येणारी ती झापड,ती काळझोप टाळण्यासाठी आतोनात प्रयत्न केले पण.... त्या झाकलेल्या पापण्या त्यातून फक्त अंधार दिसत होता. 

देवा मी तर शांत झोपलो होतो. शांत कसला खरंतर मनाने अशांतच पण तरीही..... पण तू तर पाहिलं असशील ना घरात काय झालं ते. सगळे अगदी कोलमडून गेले होते ना. सावरायचं कुणी आणि कुणाला. अगदी भयंकर परिस्थिती असेल ना. मला पण कळत होतं, पण... मनाने मी तिथेच होतो  शरीर मात्र  स्तब्ध झालं आणि कितीही वाटलं जाऊन डोळे पुसावेत,कुशीत घ्यावं मिठी मारावी तरी सगळं अशक्य. तुझ्याकडून घोळ झाला बघ.

आता सगळं हळूहळू सुरू आहे. तो कोपऱ्यातला टिमटिमणारा दिवा आणि त्या दिव्याच्या प्रकाशात लपू पाहणारा तो अंधार सगळंच विसंगत. दार वाजलं की मी आलो असेन म्हणून धावत दरवाज्यात येणारी मुलं जेव्हा नाराजीने माघारी जातात तेव्हा तुझा राग येतो.सकाळी उठल्याबरोबर हसतमुखाने समोर येणारी बायको जेव्हा निस्तेज डोळ्याने घरभर मला शोधते तेव्हा तुझा राग येतो.म्हातारी आई आणि थकलेला बाबा जेव्हा उसणं अवसान आणून जबाबदारी उचलू पाहतात तेव्हा तुझा राग येतो. खरंचच का रे तुझं गणित एवढं कच्च आहे. सगळा हिशोबच चुकवून ठेवलास तू. आणि मी पण वेडा आयुष्याचं गणित अवघड आणि अनपेक्षित असतं हे माहिती असताना तयारी करायची विसरून गेलो.ओव्हर काॕनफिडन्स नडला बघ. अरे थोडा वेळ तरी द्यायचास. एवढं करून पुन्हा कशाला रे मला अडकवून ठेवलंस तिथेच त्या सगळ्या गोतावळ्यात. न्यायला आलास ना तर पटकन न्यायचंस की. उगाच त्या दिवशी  कावळ्याला आडवलंस. किती अवघड करून ठेवलंस सगळं. निघालो होतो ना विना तक्रार मग का का हा परत डाव मांडलास. त्या दिवशी मात्र तुझी शाळा घ्यावी वाटली चांगली. जाऊ देत....

पण आता मात्र लक्ष ठेव माझ्या घराकडे. सांभाळ,बळ दे,धीट कर,सगळ्यांना. आणि हो एक इच्छा पूर्ण करशील का ? घाबरू नकोस अवाजवी काही मागणार नाही. फक्त एकदा ती रात्री झोपल्यावर तिच्या स्वप्नांत जाण्याची परवानगी दे,स्वप्नात भेटण्याची संधी दे. चार समजूतीच्या गोष्टी सांगून येतो,ऐकलं नाही तर जरा रागं भरून येतो,पूर्ण न झालेली स्वप्न सांगून येतो,थोडंसं प्रेम करून येतो,धक्क्यानं जरा वाकलीय तिला आधार देऊन येतो. करशील ना एवढं माझ्यासाठी. मग मात्र काही तक्रार न करता येईन तुझ्यासोबत. 

पुढचा प्रवास सुरू करायला..... अगदी नव्यानं


*🖋️© अश्विनी कुलकर्णी / जोशी*

*सोलापूर*

Comments