बाप्पा...
हे दहा दिवस कसे संपले कळलंच नाही रे. मागच्या वर्षी तू गेलास त्याच दिवशी मनाशी पक्क ठरवलं होतं पुढच्या वर्षी तुझं जंगी स्वागत करायचं,राहून गेलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि या जीवनाच्या रहाटगाडग्यात पुढे चालू लागलो. यंदा तुझ्या आगमनाची चाहूल लागली ती थोडी मागील वर्षापेक्षा बरी कारण मागच्या वर्षी आम्हांला तुझ्या येण्याच्या निमित्ताने भागवता येणारी कोणतीच हौसमौज करता आली नव्हती संकटच तेवढं मोठं होतं जगावर पण यंदा तू आलास तेच ही महामारी दूर करून, आणि आम्ही सगळे सज्ज होतो तुझ्या स्वागतासाठी. मग काय आठ दिवस आधी तुझ्या मुर्तीची निवड,घरात तुझ्या भोवती आरास करण्यासाठी लागणारं सामान,मखराची तयारी, दुर्वांच्या जुड्या,हार फुलं,फळ,प्रसादाची तयारी, सकाळ संध्याकाळी आरती म्हणण्यासाठी आरतीच्या पुस्तकाची शोधाशोध तर घरातल्या बच्चे कंपनीला यंदातरी *संकष्टी पावावे* असं म्हणू नका रे पोरांनो असा बजावणारा आज्जीचा खणाखणीत आवाज, सगळं कसं उत्साहात सुरू झालं. तू यायच्या दिवशी तर कुणी सोवळ्यात,कुणी झब्बा कुरता,कुणी नवीन जीन्स तर कुणी नऊवारी,सहावारी,चुडीदार,वेगवेगळे दागदागिने पुरूषांची डोक्यावरची टोपी सगळं कसं छान छान. यंदा आमच्याकडे ना ते युट्यूबवरून पूजा ऐकून तुझी स्थापना झाली. मग आरती झाली टाळ घंटा टाळ्यांच्या गजरात. कापूरार्ती आणि मंत्रपुष्पांजली झाल्यावर *घालीन लोटांगण* म्हणताना मात्र आम्ही सगळेच जागेवर जसेच्या तसे उभे. असो, सगळं झालं की आजोबा म्हणाले चला *अथर्वशिर्ष* म्हणूया तर सगळी बच्चेकंपनी पसार *सेल्फी विथ बाप्पा* सुरू होतं ना, अरे ते आजकाल *शास्त्रच* झालंय. जरा उशीर झाला टाकायला सोशल मिडीयावर तर आभाळ कोसळतं बाबा. मग कसंल आलंय अथर्वशिर्ष पठन आणि काय. आजोबांनी ऐकट्यानेच म्हणलं आणि ते अंगणात जाऊन बसले. घरातल्या महिला वर्गाची सुरू झाली स्वयंपाक घरात लगबग. आज ना,बाप्पा म्हणायला *तुझ्यासाठी* खरतर आमच्या सगळ्यांसाठी *उकडीच्या मोदकांचा* बेत होता. कधी एकदा नैवेद्य होतोय आणि मोदकांवर तुटून पडतोय असेच भाव सगळ्यांचेच. झालं पोटभर खाऊन सुस्तावलेलो आम्ही दुपारी जरा वामकुक्षीला गेलो आणि तू मात्र सकाळपासून आगमनाच्या गडबडीत एवढा दूरवरचा प्रवास करून दमलेला असून एकटाच त्या सजवलेल्या मखरात हसतमुखाने हे सगळं पहात बसला होतास. मग मात्र दररोज सकाळ संध्याकाळी आरती नैवेद्य गडबड गोंधळ आणि पुन्हा तू एकटाच. कोणाकडे तू दिड दिवस कोणाकडे पाच तर कोणाकडे दहा किंवा अकरा दिवस असतोस पण या दिवसांत जो तो आपल्या परीनं तुझं कोडकौतुक करण्यात मग्न. आणि मग येतो तो दिवस *अनंतचतुर्दशी* आज तू निघणार पुन्हा तुझ्या घरी. पुन्हा तीच गडबड तुझ्या निरोपाची तयारी, निरोपातही तेवढाच उत्साह जेवढा स्वागतात. खरंच बाप्पा हे असं कसं तेच समजत नाही. तू जेवढे दिवस असतोस तेवढे दिवस एक वेगळीच ऊर्जा असते वातावरणात आणि तू जातानाही ती सारी उर्जा भरभरून देऊन जातोस आम्हांला. येताना *पार्थिव मुर्तीच्या* रूपाने आलेला तू आम्ही तुला सजवून मखरात बसवतो पण जाताना तू तो सारा साज श्रुंगार बाजूला ठेवून पुन्हा *पार्थिव रूपातच* माघारी जातोस. आणि हे सारं पिढ्या न पिढ्या पहात आलेलो आम्ही हे समजूच शकलो नाही की तुला काय सांगायचंय आम्हांला *हे शरीर नश्वर आहे,दागदागिने पैसा अडका कपडालत्ता गाडी घोडे घरदार सगळं सगळं आहे तसं सोडून पुढे प्रवास करायचाय,रित्या हाताने आलो रित्या हातानेच जायचंय*
बाप्पा तू जाताना, गेल्यावर हे सगळं डोक्यात येतं. मग अनेक संकल्प होतात,मनाशी खुणगाठ बांधली जाते पण मनुष्य स्वभाव सगळं *क्षणभंगूर* पुन्हा *पहिले पाढे पंचावन*. पुन्हा पुढच्या वर्षीचे स्वप्न रंगवत आमचा प्रवास सुरू. तू ही हतबल झाला असशील नै. म्हणूनच तर दरवर्षी येतोस आणि जातोस *इन्सपेक्शन* करतोस आमचं आणि *प्रमोटचा* शेरा देऊन पुढच्या वर्गात ठकलतोस. पण असाच येत जा. तूझं येणं ही बरंच काही शिकवून जातं लगेचच बदल नाही झाले तरी कधीतरी होतील. आज तुला निरोप द्यायचाय हाच आशीर्वाद दे की *आमचं मन स्वच्छ राहो* पुढच्या वर्षी पर्यंत तुझ्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहतोय. *हॕपी जर्नी बाप्पा*
*गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया,उंदीर मामा की जय*
*🖋️©सौ.अश्विनी कुलकर्णी /जोशी*
Comments
Post a Comment