Skip to main content

आई

 *आई*

थकलीस ना गं....

बस जरा शांत घटकाभर. चार दिवसापासून चालूय न ही धावपळ. कशी गं तू अशी वेडी. इतकं करू नये गं आपल्या जीवापेक्षा जास्त. हसलीस ना गालातल्या गालात म्हणत असशील *जीवासाठीच करतेय जीवापेक्षा जास्त कसं असेल* आई दिवाळीला दोन दिवसच का होईना मी येणार म्हणून किती किती न काय काय केलंयस. अगं पण आयुष्यभर राबलीसच की घरासाठी,पाहुण्यारावळ्यांसाठी,आमच्यासाठी. सगळ्यांच्या आवडीचं सगळं करत राहिलीस पण कधी आवडीनं एक घास शांतपणे खाताना पाहिलं नाही गं तुला. कदाचित आमच्या आमच्या नादात असू आम्ही तुझा विसर पडला, आणि आत्ता संसाराच्या गडबडीत पुन्हा आम्ही आमच्याच नादात,पुन्हा पडला विसर. पण आई तुला का नाही पडत गं हा विसर. यावेळी पण मला आवडते म्हणून तुझ्या हातचे अनारसे आणि नातवंडांना आवडते म्हणून शंकरपाळी केलीच असेल ना.  आता यावेळी  तुला विचारूनच घ्यायचं असं ठरवून आले आहे न विसरता *तुला काय आवडतं ते* 

आम्ही येणार त्या  दिवशी तर घराला तू अगदी सजवून टाकलं होतंस. डोळ्याची निरांजनं पेटवून अंगणात येरझारा चालू होत्या तुझ्या अन् बाबांची थट्टा. कसं होणार गं तुझं... अगं दमली असशील पायाला गोळे चढत असतील बसून तरी घे. आलोय आम्ही .  अखेरीस झाली आपली भेट. अशात दिवाळीला आईकडे येणं कमीच झालं होतं. खूप वर्ष झाले  तुला वाटायचं  दिवाळसणाला यावं मी *माहेरी* लेकरांना घेऊन. म्हणूनच ठरवलं यावर्षी जायचं म्हणजे जायचं. *सासरी सगळ्यांची मनं जपता जपता तुझं मन नकळत दुखावत होते मी* हे कळत होतं मला. आता खूप खूप मनसोक्त गप्पा मारू. मन मोकळं करू,थोडं रडू,खूप हसू,ऐकमेकींचं ऐकू. संसाराच्या रामरगाड्यात दमलेली मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपायचंय,तुझा मायेचा हात डोक्यावरून फिरताना डोळ्याच्या पापण्या ओलावलेल्या तुझ्यापासून लपवायचंय आणि तुझ्या पदराला तुझ्या नकळत डोळे पुसायचेत. तू हाताने  शिवलेल्या गोधडीवर लोळायचंय,तुझी साडी पांघरायचीय,सगळं सगळं करायचंय. अगं पण मी किती स्वार्थी फक्त माझाच विचार करतेय *तू ही दमली असशील ना गं* ये घटकाभर माझ्या मांडीवर डोकं टेकवून पड. मी हात फिरवेन तुझ्या डोक्यावरून तुझ्या इतकी माया नसेल माझ्या हातात कदाचित, पण बरं वाटेल तुला. आणि काय गं अजूनही किती घाबरतेस बाबांना नकोस ना इतकी घुसमट करून घेवूस. आता तरी थोडं स्वतः साठी वेळ काढ. काय आवडतं ते वाच,ऐक,कर. बघ छान वाटेल तुला. मला आठवतं ना तू आमच्या लहानपणी किती छान छान विनकाम,भरतकाम,खाद्यपदार्थ करायचीस. साक्षात अन्नपूर्णा,सरस्वती प्रसन्न आहे तुला. आता तुझ्या आवडीचं काम कर. गारठ्यात,पाण्यात काम करण्यापेक्षा बाई लाव कामाला. या काही वर्षात येणं झालं नाही आणि फोनवरून काही कळत नाही म्हणून नक्की तुम्हां दोघांचं काय चाललंय ते समजतच नव्हतं आणि मला त्रास नको म्हणून तू काही सांगत नव्हतीस. पण आज पाहिलं किती खराब झालीयस तू. तसे बाबाही खराब वाटतायत पण तू त्यांची काळजी घेतेस म्हणून बरे आहेत ते,पण स्वतःची काळजी घ्यायची विसरतेस ना. असं करतेस का, तू आणि बाबा चला माझ्याकडे थोडे दिवस,तेवढाच थोडा बदल. बरं वाटेल तुम्हांला आणि मुलांनाही घरात मोठी माणसं असण्याची सवय लागेल आणि वळणही. आई रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावताना मला तुझी आठवण येते अगदी न चुकता. तुळशीपुढे दिवा लावतानाचं तुझं ते लक्ष्मीचं रूप डोळ्यापुढे उभं रहातं. अगं केव्हाची मीच बोलतेय, तू बोल ना काहीतरी. माझं मन होतंय मोकळं तूही कर तुझ्या मनाचा कप्पा रीता. यावर ती नेहमीप्रमाणे स्मितहास्य करत गडबडीने उठली आणि म्हणाली मुलांना भूक लागली असेल ना गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी करते. आणि आयुष्यभर आमच्यासाठी,घरासाठी,आल्यागेलेल्यांसाठी राबणारी माझी आई नातवंडांच्यासाठीही पुन्हा तितक्याच उत्साहाने उभी राहिली. सुट्टीचे ते दिवस गप्पा मारण्यात कोडकौतुक करून घेण्यात कसे निघून गेले कळलं नाही आणि निघण्याचा दिवस आलाच. मन दाटून आलेलं आणि डोळे भरून आलेली आई लोणची पापड मसाले भाजीपाला भरण्याच्या निमित्ताने कामात हळूच आपले हावभाव लपवत होती. सारं कळत होतं मला मीपण तितकीचा रडवेली झालेले पण.... गेली चार दिवस अखंड बडबड करणारी मी आज जणू शब्द जड झाले ओठांवर. जेवणावळी झाली आणि दारात रिक्षा येऊन उभी राहिली. ओटी भरताना बाबांची नजर चुकवून तिने ब्लाऊज पिसात शंभर रूपय ठेवले आणि म्हणाली *बांगड्यां भर हं तायडे* भयाण शांतता डबडबलेल्या डोळ्यातलं पाणी पापण्यांनी अडवत ऐकमेकींची नजर चुकवत होतो आम्ही दोघी. दोघांना नमस्कार करून निघताना माघारी वळून बघताना मनात विचार आला *चार दिवसाचं का होईना पण माहेरपण जगता आलं तसं आईनं माहेरपण कधी जगलं असेल का* 

प्रवास सगळा खिडकीतून बाहेर डोकावत मुलांपासून नजर चुकवत डोळ्यातलं पाणी लपवत आठवणींना उजळणी देत निःशब्द सुरू होता.......

खंत एवढीच मनात होती *माझ्यासाठी तिनं सगळं केलं माझी आई झाली पण आता तिच्या या उतार वयात मी तिची आई होण्यास असमर्थ ठरले*

*🖋️©सौ. अश्विनी कुलकर्णी / जोशी*

Comments