*मला बाबाच आठवत नाही* चर्रर्र.. झालं काळजात,त्याचं हे वाक्य ऐकून. क्षणभर पसरलेली ती शांतता जणू स्मशान शांतता भासली. काय बोलावं,कसं व्यक्त व्हावं,काहीच समजण्याच्या आत तोच अगदी निखळ,निर्मळ,खळखळून हसत मलाच विचारत होता,*मग मित्रा काय म्हणतोयस काय चालूय अजून आयुष्यात* मग मी पण थोडा भानावर येऊन त्याच्या त्या निखळ हास्यात बुडून गेलो आणि मग अनेक वर्षांनी भेटल्याने त्या जुन्या गप्पांची मैफील रंगली.*मैफील फक्त दोघांचीच* पण अगदी भरलेली.गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला हे कळलंच नाही आणि कळलं तेव्हा जवळजवळ सुर्यदेव अस्ताला आले होते. मग एकमेकांना *प्यार की झप्पी* देऊन लवकरच पुन्हा भेटण्याचं आश्वासन वगैरे देऊन झाल्यावर आम्ही दोघे आपापल्या गाड्यांमधून वेगवेगळ्या दिशेने निघालो. गाडी सुरू करताच मी सवयीप्रमाणे रेडिओ सुरू केला आणि सुरू झाला कार्यक्रम *पुरानी यादोंका सफर* दोन तीन गाण्यांनंतर गाणं लागलं ते *तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हू़ मैं.तेरे मासुम सवालोंसे परेशान हूँ मैं* आणि अचानक माझा ब्रेक लागला कर्रर्र... आणि मी दचकलो. कसतरी वाटू लागलं म्हणून गाडी बाजूला घेतली,तोंडावर थोडं पाणी मारलं,एसी वाढवला...