*आई* थकलीस ना गं.... बस जरा शांत घटकाभर. चार दिवसापासून चालूय न ही धावपळ. कशी गं तू अशी वेडी. इतकं करू नये गं आपल्या जीवापेक्षा जास्त. हसलीस ना गालातल्या गालात म्हणत असशील *जीवासाठीच करतेय जीवापेक्षा जास्त कसं असेल* आई दिवाळीला दोन दिवसच का होईना मी येणार म्हणून किती किती न काय काय केलंयस. अगं पण आयुष्यभर राबलीसच की घरासाठी,पाहुण्यारावळ्यांसाठी,आमच्यासाठी. सगळ्यांच्या आवडीचं सगळं करत राहिलीस पण कधी आवडीनं एक घास शांतपणे खाताना पाहिलं नाही गं तुला. कदाचित आमच्या आमच्या नादात असू आम्ही तुझा विसर पडला, आणि आत्ता संसाराच्या गडबडीत पुन्हा आम्ही आमच्याच नादात,पुन्हा पडला विसर. पण आई तुला का नाही पडत गं हा विसर. यावेळी पण मला आवडते म्हणून तुझ्या हातचे अनारसे आणि नातवंडांना आवडते म्हणून शंकरपाळी केलीच असेल ना. आता यावेळी तुला विचारूनच घ्यायचं असं ठरवून आले आहे न विसरता *तुला काय आवडतं ते* आम्ही येणार त्या दिवशी तर घराला तू अगदी सजवून टाकलं होतंस. डोळ्याची निरांजनं पेटवून अंगणात येरझारा चालू होत्या तुझ्या अन् बाबांची थट्टा. कसं होणार गं तुझं... अगं दमली असशील पायाला...