आम्हाला पण स्पेस हवीय :
लहानपणी स्पेस म्हणजे अंतराळ ऐवढाच अर्थ माहित होता. पण परवा मैत्रीणीकडे गप्पा मारायला गेले, तेव्हा तिने तिच्या आठ वर्षाच्या मुलीला आवाज दिला आणि बोलावून घेतलं ,म्हणाली बच्चू मावशी आलीय ये गप्पा मारायला at_least say hello to her baby. तेवढ्यात ती चिमुरडी जोरात बोलली please mom give me space yaar. मला अगदीच आश्चर्य वाटलं की एवढ्याशा चिमुरडीला कसली हवीय Space. मी गप्पा मारून तिचा निरोप घेऊन निघाले खरी. घरीही पोहोचले, पण डोक्यातून स्पेस हा शब्दच जाईना. दिसायला, लिहायला आणि उच्चारायला अगदी छोटासा शब्द असला तरी खूप मोठा अर्थ आहे या शब्दाला. मन विचाराने सैरभैर झालं होतं.डोक्यात प्रचंड विचारांचं वादळ आणि विविधांगी प्रश्न बरीचशी अनुत्तरीतच.खरंच काय आहे ही स्पेस ? छोट्या छोट्या मुलांना आई-बाबां पासून स्पेस हवीय, तरूण मुलांना त्यांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी कुटुंबाबरोबरच समाजापासूनही स्पेस हवीय,मुलगा सुनेला आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापासून स्पेस हवीय. अर्थात सध्या सगळ्यांनाच स्पेस हवीय स्वतःची. मला तर लहानपणी आज्जी सांगायची ती गोष्ट आठवली ध्रूव बाळाची. त्यालाही हवी होती स्पेस म्हणून त्याने चक्क ब्रम्हदेवांनाच भाग पाडलं त्याला त्याची स्पेस देण्यासाठी. म्हणजे स्पेस मागणं ही काही आत्ताची fashion नाही एवढं मात्र निश्चित झालं. पण ध्रूव बाळाला त्याची स्पेस म्हणजेच त्याचं अढळ स्थान हवं होतं कारण तो त्या जागेसाठी योग्य होता. त्या चिमुरडीला जी स्पेस हवी होती ती काही यासारखी नक्कीच नव्हती. हल्ली मुलांना मोठ्या माणसांसोबत बसायला उठायला, त्यांच्याशी गप्पा मारायला,गोष्टी ऐकायला,त्यांचे अनुभव ऐकायला नको असतं. या मोठ्या माणसांचा आणि त्यांचा म्हणे treand match होत नाही. त्यांना म्हणे काय ते आॕक्वर्ड फिल होतं. तर हल्लीच्या काळातील मुलींना सासू सासरे नको कारण काय तर घरात स्पेस नाही मिळत. मी म्हणते 2bhk फ्लॕट मध्ये सुध्दा दोन माणसांमुळे इतकी स्पेस व्यापते का ? न उलगडनारं कोडं. आणि हीच पिढी पुढे मुलंबाळं झाली की पाळणाघरं शोधतात मुलांच्या संगोपणासाठी. मग तिथले ते सांभाळ करणारे आजी आजोबा चालतात कारण ते त्यांच्या स्टॕन्डर्ड ला मॕच करतात ना. कसलं काय पैसे देऊन विकत घेतलेली नाती. त्यापेक्षा घरातच असलेल्या माणसांवर जर मुलं सोपवली तर बाहेरच्या संस्कृती शिकून मोठी होण्यापेक्षा घरातील संस्कार शिकून घडेल ही पुढची पिढी.
असंच काही नाही हं की या नवीन पिढीलाच स्पेस हवीय. अहो काही ठिकाणी ही मोठी माणसं देखील या so called स्पेसच्या नावाखाली आपल्या जबाबदाऱ्या टाळू पाहतात. म्हणे आम्ही आयुष्यभर खूप कष्ट केले, संसाराचा गाडा ओढता ओढता कंटाळून गेलो, मुलंबाळांना मोठं करताना स्वतःसाठी वेळच नाही मिळाला. आणि आता मुलगा सून दोघे नोकरीवर गेल्यावर पुन्हा तीच घराची जबाबदारी नको, आम्हाला आता स्पेस हवीय. पण यामुळे होतं असं की आपलंच कुटुंब विस्कळीत होतं. नातवंड आजी आजोबांच्या प्रेमाला, मायेला,संस्कारांना मूकतात. या मोठ्यांच्या चढाओढीत ही निरागस मुलं गुदमरून जातात. मलाही अगदी मान्य की स्पेस गरजेची आहे अगदी प्रत्येकालाच, आणि ती मिळायलाच हवी. पण त्यासाठी वेगवेगळ्या दिशांचा अवलंब का करायचा. एकमेकांना समजून घेत,खेळीमेळीने पण स्पेस ही दिलीच जाऊ शकते की, जशी ध्रूवबाळाने मिळवली. ध्रूवाच्या सावत्र आईने जेव्हा त्याला त्याच्याच वडीलांच्या मांडीवरून खाली उतरवलं तेव्हा तोही उलटं बोलूच शकला असता की किंवा त्याची आईसुध्दा भांडू शकली असती. पण त्या दोघांच्या सामंजस्याने आज ध्रूवबाळ हा ध्रूवतारा झाला, आपल्या अढळ स्थानी गेला आणि सर्वश्रेष्ठ ठरला. मग आपण का नाही हा मार्ग अवलंबत.
त्या चिमुरडीच्या वागण्याने एक मात्र झालं माझ्या मनाचे दरवाजे उघडले. जळमटं साठलेल्या मनातील सगळे कप्पे कसे लख्ख स्वच्छ झाले. त्यानंतर मी परत माझ्या त्या मैत्रीणीकडे गेले आणि तिच्याशी बोलले की तो छोटासा जीव तुझं अनुकरण करतोय. तू जी स्पेस घरात शोधतेस तीच स्पेस ती घरात स्वतःची पण वेगळी तयार करू पाहतेय. अजूनही वेळ आहे . समजून घे, समजावून सांग. आणि तुझ्या चिमणीला तिची तिची स्पेस दे पण ती स्पेस दे *तुझ्या मनात* मग बघ काय होतं ते.
एवढं बोलून मी निघाले माझ्या घरी माझ्या माणसांकडे माझी त्यांच्या आयुष्यातली स्पेस शोधायला आणि माझ्या मनात त्यांना त्यांच्या हक्कांची स्पेस द्यायला.
सौ.अश्विनी अमोल जोशी
951,2/अ, आदर्श नगर
सोलापूर.
Va mast
ReplyDeleteThanks
DeleteThanku
ReplyDeleteKhupach chan lihilai. Lovely
ReplyDelete