नाव - आदर्श नगर
तसं पहायला गेलं तर मी अगदी हट्टानेच माझी एम.ए ची डिग्री मिळवली. पण त्याचवेळेस काकांनी म्हणजेच माझ्या बाबांनी माझ्या लग्नाचं रणशिंग फुंकलेलं होतं. एकच फर्मान पुढे जे काही शिकायचंय ते सासरी गेल्यावर तिकडील लोकांच्या संमतीने. मी जन्मतःच अगदी उत्साही. जे जे काही म्हणून करायला मिळेल ते ते केल्याशिवाय शांत बसली तर ती अश्विनी कुठली ? अशा धर्तीची मी. काकातर म्हणायचे अजीब रसायन आहे.पण आई काकांनी कधीच कसलीच बंधनं नाही घातली लग्नाखेरीज. चला मग काय सुरू झालं वरसंशोधन आणि माझ्याच जीवश्चकंठश्च मैत्रीणीच्या म्हणजेच स्मिताच्या आईने अक्कांनी सुचवलं हे अमोल जोशींचं स्थळ. अमोल जोशी , रेल्वे कर्मचारी , राहणार *आदर्श नगर * सोलापूर. दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला आणि आम्हाला मुलगामुलगी पसंत आहेत म्हणून घरची मंडळी लागली पुढच्या तयारीला. अर्थात आमच्या दोघांच्याही संमतीने.25/1/2003 ला देवाब्राम्हणाच्या साक्षीने विधीवत लग्न करून मी गृहप्रवेश केला जोश्यांच्या घरात आणि ओघाने आदर्श नगरात. माहेरची पक्की देशस्थ आणि सासरी कोकणस्थ या अनोख्या समिकरणाशी मिळतं जुळतं घेत घेत मी शिकत गेले. आमच्या या आदर्श नगर मध्ये मी पाहिलं की प्रत्येक घरात तीन तीन पिढ्या गुण्यागोविंदाने हसत खेळत अगदी सुखाने नांदत होत्या. अर्थात माझ्याही घरात आम्ही तीन पिढ्या होतो. आमच्या आज्जी इंदिराबाई जोशी, आमच्या आई सुनंदा जोशी आणि आता नुकताच प्रवेश केलेली तिसरी पिढी म्हणजे मी.खूप वेगळं वातावरण. सोसायटी मधल्या प्रत्येक घरातून प्रचंड सकारात्मक उर्जा मिळायची. एकमेकांना प्रोत्साहन देणे, समजून घेणे,हे तर इथल्या लोकांचे वैशिष्टय. आदर्श नगर मध्ये घराघरातून जरी तीन तीन पिढ्या रहात होत्या तरी तिथे कधीच सासू-सून हा शब्द मी लिहीला तसा वेगळा नव्हता तर तो सासूसून असा होता. या एका अवघड नात्याचं इतकं सोप्प गणित मी अनुभवत होते. फक्त स्वतःच्याच सूनेलाच कौतुकाने आंजारतगोंजारत बसणं हे आमच्या आदर्श नगरच्या सासवांना कधी जमलंच नाही याचा मला अभिमान आहे. त्यावेळेस सगळ्यात लहान आदर्श नगरची सून ही मीच. लग्नानंतर घराबरोबरच सोसायटीतल्या लोकांनी पण माझं खूप कोडकौतुक केलं. अगदी सांगायचं तर मला दिवस गेलेत हे समजल्यावर माझं पहालं डोहाळेजेवन ही आमच्या सोसायटीतल्या सगळ्या आजेसासवांनी म्हणजेच आमच्या आजींच्या मैत्रीणींनी मिळून केलं. एक वेगळंच रसायन आमचं आदर्श नगर. मला आठवतं माझी पहिली मुलगी आमची अवनी झाल्यावर आमच्या आज्जींनी चक्क संपूर्ण सोसायटीमध्ये *पेढे* वाटले. मुलगा मुलगी समान वागणूक आणि समान आदर हे आम्हा आदर्शनगर वासियांचं वैशिष्टय. आणि म्हणूनच की काय आमच्या आदर्श नगरच्या प्रत्येक घरात मुलीच्या रूपाने लक्ष्मी नांदते. कला, शिक्षण,सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, अशा प्रत्येक क्षेत्रात कुठलाही हेतू मनात न ठेवता अगदी निर्मळ मनाने कार्य करायचे हे आदर्श नगरने मला शिकवले. अगदी नावाप्रमानेच *आदर्श* असलेल्या या सोसायटीचा आणि इथल्या लोकांचा मला खरंच अभिमान आहे. अनेकते मध्ये एकता हे आमचं ब्रिदवाक्य. नक्कीच पूर्वजन्मीचे संचीत असणार म्हणून मी जोश्यांची आणि ओघाने आदर्श नगरची सून झाले. याचा मला सार्थ अभिमान आहे.
सौ.अश्विनी अमोल जोशी
951,2/अ, आदर्श नगर,
सोलापूर.
मस्त
ReplyDeleteYou are great
Thanku
Delete